मिरा-भाईंदर/विजय काते: मिरा-भाईंदर आणि वसई -विरार परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं सत्र वाढत जात आहे. गुरुवारी एका तरुणाने त्याच्याच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटन समोर आली. त्याचबरोबर प्रेमातील ताणतणावामुळे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं. दोन्ही धक्कादायक घटनेतून सावरत नाही तेच आता काही गुन्हेगारांकडून पोलीसांनी अग्नीशस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वसई-विरार आणि मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका तरुणाकडून दोन अग्नीशस्त्र, पाच जिवंत काडतुसे, दोन रिकाम्या मॅगझिन्स आणि मोबाईलसह एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई अहमदाबाद-मुंबई महामार्गावर वसोंचा गाव येथील वाटिका हॉटेलसमोर करण्यात आली.
पोलीसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त मधुकर पांडेय यांच्या सूचनेनुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर, खंडणी विरोधी पथकाने तत्काळ सापळा रचून दिनांक 12जून रोजी रात्री 10.40 वाजता संशयित इसम विशाल धर्मेंद्र कनोजिया (वय 20, रा. आझमगड, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन आणि एक मोबाईल जप्त करण्यात आले.
विशाल कनोजियाविरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंधुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख व त्यांच्या टीमने पार पाडली.
कारवाईत सपोनि. विलास कुटे, विजयेंद्र आंबवडे, ओंकार कोचे, शकील पठाण, पोहवा राजवीर संधु, सतिष जगताप, राजाराम काळे, सुनिल गोमासे, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार व साकेत माघाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच अवघ्या दोन दिवसांत शहरात दोन वेगवेगळ्या हत्या घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.पहिली घटना भाईंदर पश्चिम येथील असून, एका तरुणाने वैयक्तिक वादातून आपल्या मित्राचा कोयत्याने निर्घृण खून केला. ही घटना शहरातील मुर्दा खाडी परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासांत पुणे येथून अटक केली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे व सूत्रांच्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवून ही यशस्वी कारवाई केली आहे. शहारात गुन्हेगारी वाढत असाताना पोलीस यंत्रणा सतर्क राहत कर्तव्य बजावत असल्याने मीरा भाईंदर पोलीसांचं कौतुक केलं जात आहे.