बोपदेव घाट अत्याचारप्रकरणी मोठी माहिती समोर; 8 एप्रिलला...
पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींवर सरकार पक्षातर्फे ८ एप्रिलला आरोप निश्चितीचा मसुदा सादर केला जाणार आहे. तत्पुर्वी या घटनेतील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या अनुपस्थितीत खटला चालविण्यात यावा, यासाठीही सरकार पक्षातर्फे अर्ज केला जाणार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे, पण त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. तिच्या मित्राला मारहाण आणि झाडाला बांधून या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला होता. लूटमारीच्या उद्देशाने गेलेल्या या तिघांनी हे घृणास्पद कृत्य केले होते. नंतर पोलिसांनी दहा दिवसांनी दोघांना वेगवेगळ्या ठिकानावरून पकडले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घटना घडली होती.
याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार या काम पाहात आहेत. त्यांनी गुरुवारी (ता.२०) अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात राज्य सरकारची अधिसूचना दाखल केली आहे. पुढील सुनावणीला आरोप निश्चितीचा मसुदा सादर करत फरार आरोपीच्या अनुपस्थितीत त्याच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात खटला चालविण्यासाठी सरकार पक्ष प्रयत्नशील असणार आहे. राज्याच्या विधी व न्याय खात्याने अधिसूचना काढून हे प्रकरण तत्परतेने चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोमनाथ यादव अद्याप फरार
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय २७) आणि चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०) यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर तिसरा आरोपी बाप्या गोसावी ऊर्फ सूरज दशरथ गोसावी ऊर्फ सोमनाथ यादव हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तिन्ही आरोपींविरोधात ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.