स्वारगेट अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; एसटीच्या तीन अधिकाऱ्यांवर थेट...
पुणे : स्वारगेट बस स्थानक परिसरात २५ फेब्रुवारीला पहाटे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख मोहिनी ढगे या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तथापि, यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित बस स्थानकावरील त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची याप्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षासंदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले होते.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई
या बस स्थानकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार मार्च रोजी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुखांचे निलंबन करण्यात आले आहे.