CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी...
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीजीएसटीचे अधीक्षक पंकज कुमार आणि सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना अटक केली आहे. न्यू पनवेल येथील एका पुनर्विकास प्रकल्पात सीजीएसटीच्या २४ फ्लॅट्सचा ताबा देणे आणि एनओसी जारी करण्याच्या मोबदल्यात ही रक्कम मागण्यात आल्याचा आरोप आहे.
सीबीआयने जाळे रचून सल्लागाराला 10 लाख रुपयांची लाच घेताना पकडले आणि त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. रायगड जिल्ह्यातील न्यू पनवेल येथील सेक्टर-१७ मध्ये खासगी रिअल इस्टेट कंपनी दोन इमारतींचा पुनर्विकास करत आहे. कंपनीच्या प्रोजेक्ट प्रमुखाच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
3 टप्प्यांत ठरली लाचेची रक्कम
1 कोटीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचे ठरले होते. यामध्ये १० लाख रोख, एका फ्लॅटसाठी २० लाख रुपये डाऊन पेमेंट आणि ७० लाख दिल्ली येथील डीजी एचआरडी, सीजीएसटी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना देण्याचे सांगण्यात आले होते.
स्वामी यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच…
सीबीआयनुसार, पंकज कुमार यांनी तक्रारदाराला १० लाख रुपये सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांच्याकडे देण्यास सांगितले. ठरलेल्या योजनेनुसार, स्वामी यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने त्यांना पकडले. त्यानंतर पंकज कुमार यांनाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, तेथून त्यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार






