Chain scratching near Bapodi during Sant Tukaram Maharaj palanquin ceremony Pune Crime News
पुणे : आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली असून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये विसावल्या आहेत. उद्या (दि.22) दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आषाढी वारी पालखीमुळे मोठी ग्रदी झाली होती. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उत्साहामध्ये पुणेकरांनी पालख्यांचे जोरदार स्वागत केले. यामध्ये मात्र चोरट्यांनी देखील हात साफ केले असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यामधील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची भेट होत असते. संत तुकाराम महाराज यांची देहूमधून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदीहून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते. दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी सहभागी होत असतात. यामध्ये अनेक माय माऊली देखील सहभागी होतात. तसेच पालखी पाहण्यासाठी देखील महिलांची मोठी गर्दी होत असते. याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असल्याचे दिसून आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पालखी सोहळ्यासाठी बोपोडी चौक व खडकी रेल्वे स्टेशन परिसरात चोरीची घटना घडली आहे. पालखी सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेसह दोघींकडील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जूनी सांगवी येथील ६८ वर्षीय महिलेने तक्रार देखील दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.२०) दुपारी बोपोडी चौक व खडकी भागात या मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत. तक्रारदार महिला या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी बोपोडी भागात आल्या होत्या. दुपारी सुमारे एकच्या सुमारास मोठी गर्दी होती. हा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील आणि त्यांच्या सोबत असलेल्या दुसर्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. मंगळसूत्र चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खडकी पोलिसांत धाव घेतली.
तक्रारदार महिलेच्या तक्रारीनंतर आता खडकी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, दरवर्षी पालख्यांच्या गर्दीमध्ये चोरटे सक्रीय होतात. महिलांकडील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडतात. त्याला आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून साध्या वेशात पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, तरीही चोरीच्या घटना घडत आहेत. आता देखील तीन महिलांच्या मंगळसूत्राची चोरी झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलिसांकडून वारी सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पालखी मार्ग, विसावा ठिकाणांची आणि मुक्काम स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि विशेष पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे. पालखी मार्गावर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या संकल्पनेतून ‘फिरते पोलीस ठाणे’ उभारण्यात आले आहे. जे वारी सोहळ्यासोबत असणार आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह महिला पोलिसांचा समावेश असणार आहे. हे फिरते पोलीस ठाणे प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न करणार असून, भाविक व वारकऱ्यांना मदत करणार आहे. सोबतच महिला छेडछाड, चोरी, मोबाईल स्नॅचिंग अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.