ठाणे/ स्नेहा काकडे : दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज 50रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलालांविरुद्ध आवाज उठवणारे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्यावरच सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा चौकी येथे ऑकरन्स रिपोर्ट दाखल केला आहे.
या प्रकाराविरोधात आज कल्याण जिल्हा प्रमुख मा. दीपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन, फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली.
रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले की, “दिवा परिसरातील रस्ते, फूटपाथ हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत, हप्ता वसुली करत अनधिकृतरित्या व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालू नये. मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढा देत आहे.”ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, संबंधित अधिकारी व गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम, कलवा शहर प्रमुख लहू चालके,दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, युवा शहरअधिकारी अभिषेक ठाकूर, डोंबिवली उपशहरप्रमुख चेतन म्हात्रे तसेच डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कलव्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.