खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे 25 वर्षे वचर्स्व राहिले आहे. ते कायम राखण्यासाठी शिंदे गटासह ठाकरे गट पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी निवडणूक एकत्र लढणार की नाही याबाबत खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अमित शाहांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखे आहे. शिंदे गट हा अमित शाहांच्या मालकीचा आहे. अमित शाहांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना नैराश्य आले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यातील भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलबच्चन भैरवी असे म्हणत हिणवले होते. तेव्हापासून बोलबच्चन शब्द हा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आला आहे. याबाबत टीका करताना खासदार राऊत म्हणाले की, बोलबच्चनगिरीची ही प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळाला आहे. आम्ही सुद्धा काही वर्षे त्यांच्यासोबत युतीत होतो. त्यामुळे तो गुण लागला असावा. मोदी हे जागतिक बोलबच्चन महामंडळाचे आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून बोलबच्चनपणा जमत नाहीत. ते उघडे पडतात असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधू मागील वाद विसरुन एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान देखील केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, शिवसेनेची मानसिकता आणि भूमिका स्पष्ट आहे. मराठी माणसाची एकजूटता व्हावी असे उद्धव ठाकरे यांना वाटते असे ते म्हणाले. या एकजुटतेसाठी प्रयत्न करत आहेत. राज्यामध्ये दोनच पक्ष समविचारी आहेत, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना व मनसेच्या युतीचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुखांचा ब्रॅंड पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे महाराष्ट्रात नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.