
Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न
चंदिगढ : प्रेयसीशी लग्न करण्यासाठी हट्ट धरणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने आपल्याच पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चंदिगढमध्ये घडला. त्यानंतर आईवरही हल्ला करून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, घटनास्थळावरून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव नितीन सिंह (४५) असून ते चंदिगढ पोलीस मुख्यालयातील अकाऊंट्स विभागात कार्यरत होते. सेक्टर २२ येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरमानला त्याच्या प्रेयसीशी तातडीने लग्न करायचे होते. यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांवर दबाव टाकत होता. मात्र, त्याचे वय १८ वर्षे असल्याने पालकांनी त्याला कायदेशीर वय पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी लग्नाच्या मुद्द्यावरून घरात पुन्हा वाद झाला. आरोपीने लग्नासाठी वडिलांकडे १० लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वाद वाढल्यानंतर त्याने घरातील गावठी पिस्तूल काढून वडिलांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
वडिलांवर हल्ल्यानंतर आरोपीने आईवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आईने त्याच्या तावडीतून सुटका करून घराच्या टेरेसवर धाव घेतली आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपीने घरात बाहेरील व्यक्ती घुसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, चौकशीदरम्यान या कथित बनावातील विसंगती समोर आल्यानंतर पोलिसांनी अरमानला ताब्यात घेतले.
तपासात आरोपीविरोधातील यापूर्वीच्या एका प्रकरणाचीही माहिती समोर आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला मनिमाजरा परिसरात मित्राची महिंद्रा थार चालवत असताना त्याच्या वाहनाची दुचाकीला धडक झाली होती. या अपघातात दुचाकीवरील दोन भावांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अरमानला अटक झाली होती आणि तो सध्या जामिनावर बाहेर होता. या पार्श्वभूमीवर चंदिगढ पोलिसांकडून हत्या, आईवरील हल्ला आणि यापूर्वीच्या अपघाताच्या प्रकरणासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.