
तलावाभोवतीची अतिक्रमणे हटवा; प्रभावशाली व्यक्तींचीही गय करू नका, हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश
अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईबाबत स्वतंत्रपणे आणि कायद्यानुसार काटेकोरपणे काम करण्याचे आदेशही प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने प्रशासनाला दिले. तसेच, अतिक्रमण हटाव मोहिमेच्या प्रगतीवर न्यायालय बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिज्ञापत्र केवळ न्यायालयाची दिशाभूल करणारे आणि दिखावा करणारे सादर करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिला. तसेच तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू ठेवण्यास न्यायालयाने महापालिकेला परवानगी देताना कचरा हटवण्याच्या कामाला एकवेळचे काम समजू नये, असेही न्यायालयाने सुनावले. कचरा टाकणे थांबवण्याचे आणि तलाव आणि सभोवतालच्या खारफुटीची सातत्याने देखभाल करण्याचेही बोरिवलीच्या न्यायालयाने महापालिकेला बजावले. तत्पूर्वी, न्यायालयाच्या आदेशांनुसार, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन) उज्ज्वला भगत न्यायालयात सुनावणीदरम्यान उपस्थित होते.
नेमके प्रकरण काय?
चास्कोप, सेक्टर ७ मधील नैसर्गिक तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा तलाव खारफुटीच्या ५० मीटरच्या संरक्षित पट्ट्यात (बफर झोन) आहे. तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि कचरा तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी ‘गॅबियन वॉल’ (दगडांची भिंत) बांधण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे.
कायदेशीर नसलेली बांधकामे हटवली जाणार
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांचे तपशीलवार प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. प्रशासनाने संयुक्त पाहणी, प्रत्यक्ष पडताळणी तसेच बांधकामांची ओळख पटवणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे ही कामे पूर्ण केली असून अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटिसाही पाठवल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), वन विभाग, म्हाडा आणि महसूल विभागाशी समन्वय साधला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. कायदेशीररीत्या हटवण्यास पात्र असलेली आणि कोणत्याही कायदेशीर निर्बंधांमुळे संरक्षण न मिळालेली बांधकामे हटवली जातील. तसेच, ही प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ नंतरच्या सहा आठवड्यांत पूर्ण केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला आश्वासित केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)