
Sambhajinagar Crime: 'शॉर्टकटने नेतो' म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला ही पती आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. सोमवारी संध्याकाळी घरगुती कारणावरून तिचा पतीसोबत वाद झाला होता. त्यामुळे ती अतिशय चिडून आणि रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडली. एका ऑटोरिक्षाने ती कायगाव येथे पोहोचली आणि तिथे असलेल्या रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ बराच वेळ बसून राहिली.
रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास एक तीन आसनी ऑटोरिक्षाचालक तिच्याजवळ आला. एक महिला एवढ्या रात्री एकटीच बसलेली पाहून त्याने तिच्याकडे चौकशी केली. महिलेने त्याला जोगेश्वरीजवळील रांजणगाव येथे सोडण्यास सांगितले. रिक्षाचालकाने तिला सुरक्षित घरी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आणि तिला रिक्षात बसवून घेतले.
रिक्षात बसवल्यानंतर चालकाने रांजणगावच्या मार्गाने न जाता रिक्षा दुसऱ्याच मार्गाला वळवली. गंगापूर परिसरात पोहोचल्यानंतर महिलेच्या हे लक्षात आले आणि तिने चालकाला विचारणा केली. मात्र, चालकाने “हा रस्ता शॉर्टकट आहे, मी तुम्हाला व्यवस्थित घरी सोडतो,” असे सांगून तिला जाळ्यात ठेवले. काही तासांचा प्रवास केल्यानंतर मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चालकाने ऑटोरिक्षा जांबरगाव परिसरातील एका अंधाऱ्या व निर्जन ठिकाणी थांबवली. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून मागितले आणि तिच्या गळ्यावर हात ठेवला.
जीवावर बेतलेल्या या प्रसंगात पीडित महिलेने अत्यंत धैर्याने चालकाचा हात हिसकावून तिथून पळ काढला. ती धावत मुख्य रस्त्यावर पोहोचली आणि तेथील एका चहाच्या टपरीवर गेली. टपरीचालकाला सर्व प्रकार सांगून तिने तात्काळ पोलिसांना फोन करण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित महिलेला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली व तिच्या तक्रारीवरून अज्ञात ऑटोरिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव परिसरात मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
Ans: रात्री ११ वाजता कायगाव येथे एकटी बसलेल्या महिलेला जोगेश्वरीजवळील रांजणगाव येथे सुरक्षित सोडण्याचे आश्वासन देऊन आणि नंतर 'शॉर्टकट रस्ता' असल्याचे सांगून चालकाने तिला निर्जन ठिकाणी नेले.
Ans: चालकाने सोन्याचे दागिने मागून गळ्याला हात लावल्याने महिलेने त्याचा हात हिसकावून तिथून पळ काढला आणि मुख्य रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर पोहोचून पोलिसांना फोन केला.