
Photo Generate AI
नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आधार शेतकरी जलदूत समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र, सायंकाळपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने समितीचे प्रमुख पंडित शिंदे यांनी नांदूर मधमेश्वर कार्यालयात आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसह शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून आंदोलक उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे महिला आणि लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. भरउन्हात निघालेल्या या मोर्चामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला. रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तने आणि कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविणे, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या.
आंदोलकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या कामासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पाणी सोडण्याचा निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाला जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश मलांडे, मर्चेंट बँकेचे अध्यक्ष चाळासाहेब संचेती, सरला बेटाचे मधुकर महाराज, वाल्मीक शिरसाट, डाॅ. प्रतापराव निंबाळकर आणि अॅड. प्रदा चंदने यांनी भेट देऊन पाठिंबा देण्यात आला.
Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो