
(फोटो सौजन्य-X)
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर येथे होणारा बालविवाह रोखला. शुक्रवारी (दि.२३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालोजी चव्हाण यांना यवतेश्वर (ता. सातारा) येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पाठवून तात्काळ कारवाई करण्यात आली.
पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, किरण जगताप यांच्यासह बालकल्याण समितीच्या प्रतिनिधी सुजाता शिंदे, तनया घोरपडे तसेच ग्रामसेविका प्रज्ञा माने यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी अनिल जाधव (रा. केसरकर पेठ, सातारा) यांच्या अल्पवयीन मुलीचा आणि शहानु पिटेकर यांच्या मुलाचा बालविवाह लावण्यासाठी नातेवाईक जमल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. मात्र, होणारे नववधू-वर मुलगा व मुलगी हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
हेदेखील वाचा : Amravati News: १ जानेवारीपासून ‘या’ जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त’, बालविवाह झाल्यास होणार कारवाई
दरम्यान, यानंतर संबंधित मुलगा, अल्पवयीन मुलगी तसेच त्यांच्या नातेवाईकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून बालविवाह न करण्याबाबत बॉण्ड लिहून घेण्यात आला असून, कायदेशीर समज देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली. पोलीस प्रशासन आणि बालकल्याण समिती यांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
बालविवाहावर प्रशासनाचे कडक पाऊल
अमरावती जिल्ह्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, १ जानेवारीपासून ‘बालविवाहमुक्त जिल्हा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सरपंच, पोलिसपाटील आणि आशासेविका यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे दाखल झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर आता बुलडाण्यात बालविवाह झाल्याचे उघडकीस आले. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचे प्रकरण गर्भवती राहिल्यानंतर समोर आले. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पती, सासरा आणि वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार, पॉक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.