Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, "ते फिर्याद देण्यास..."
मुंबई: अक्कलकोटमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. “माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.दरम्यान हा मुद्दा आज विधानसभेत गाजला. विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभेत काय म्हणाले काँग्रेस नेरते विजय वडेट्टीवार?
ज्या माणसाने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला, त्यामागे त्याचा मुख्य उद्देश काय होता? हल्ला करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. बंदूक असल्यामुळे आधीच त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एकाच्या हत्येप्रकरणी तो तुरुंगात होता. प्रवीण गायकवाड यांचे प्राण घेण्याचा प्रयत्न कालच्या हल्ल्यात करण्यात आलेला आहे. कार्यक्रमावेळी पोलीस बंदोबस्त नव्हता का? या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उत्तर काय?
काल झालेल्या या घटनेची मी संपूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही संभाजी नाव का ठेवले? छत्रपती संभाजी का ठेवले नाही? अशा प्रकारचा वाद निर्माण करून प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते. तक्रार देण्यासाठी पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली होती, मात्र ते फिर्याद देण्यास तयार नव्हते. मात्र पोलिसांनी फिर्याद घेतली. त्यानंतर आरोपीना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. घटना घडली आहे, त्यानुसार कलमे लावावी लागतात. त्यामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावरुन काँग्रेस आक्रमक
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला आहे. प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.