
crime (फोटो सौजन्य: social media)
महाराष्ट्र राज्याची ८७७.९७ किमी अंतराची सागरी किनारपट्टी संपूर्ण सुरक्षित आहे, असा दावा शासकीय यंत्रणा करीत असल्या तरी ही किनारपट्टी आजही असुरक्षितच असल्याचे समोर येत आहे.२६/११ च्या हल्ल्याला आणखी तीन वर्षांनी दोन दशके होतील. मात्र या दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात घर करून आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी २३ नव्या कोऱ्या सागरी बोटी दाखल झाल्या. त्या आधी तट सुरक्षेसाठी ९ बोटी होत्या.
कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी
मुंबईतील सागरी तट सुरक्षेसाठी एकूण ४६४ जणांचा स्टाफ मंजूर करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात १७२ कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. यावरून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्याचे दिसून येत आहे. शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारण्यात आली असली तरी सुरक्षिततेचे आव्हान कायम आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेता या मुंबई मायानगरीला सहज लक्ष्य केले होऊ शकत असल्याने सुरक्षा यंत्रणांना कायम अधिक सतर्क राहावे लागेल, असे सुरक्षा जाणकरांचे म्हणणं आहे.
अपुऱ्या पोलिसांमार्फत सुरू आहे गस्त
मुंबईतील गस्तीची स्थिती दुर्लक्षित आहे. सागरी पोलिस ठाणे एक हे माहीम फिशरमेन कॉलनीतून कार्यरत असले तरी सागरी पोलिस ठाणे दोनसाठी अक्सा चौपाटीवर जागा न मिळाल्याने बोरिवली पश्चिमेतील योगी नगर वसाहतीतून तात्पुरते काम सुरू आहे. या पोलिस ठाण्यांना कार्यकारी दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही. सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना केंद्राने तीन तर राज्य शासनाने २३ जलद नौका पुरवल्या आहेत. या नौकांद्वारे यलोगेट आणि सागरी पोलीस ठाण्यांतील अपुऱ्या पोलिसांमार्फत गस्त सुरू आहे.
दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन २६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्रकिनारी ७० तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. निर्मनुष्य जेट्टी, बेटे तसेच खाडीच्या परिसरात फिरती गस्त सुरू आहे. याशिवाय वर्षातून दोनदा सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ‘सागर कवच अभियान’ राबविले जाते. नादुरुस्त बोटी वापरण्यायोग्य व्हाव्यात यासाठी दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. – देवेन भारती, पोलिस आयुक्त, मुंबई
२६/११ च्या हल्ल्याला पुढल्या महिन्यात नोव्हेंबर १७ वर्षे पूर्ण होतील. मूठभर आलेल्या अतिरेक्यांनी बेसावध मुंबईला असे काही जागे केले की त्यानंतर सुरक्षेसंदर्भात आपण हलगर्जीपणा करत आहोत ते समोर आले. आणि आता पुन्हा एकदा आपली सुरक्षा व्यवस्था कमजोर पडत असल्याचे समोर आले आहे. जर वेळीच आपण सुरक्षेसंदर्भात कठोर पावले उचलली नाही तर दहशतवादी हल्ला पुन्हा होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आताच जर सागरी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही तर मुंबईवर पुन्हा दहशतवादी झूला होण्याची भिती शक्यता वाटत आहे. – देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती