शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मदत देण्यासाठी प्रस्तावाची कसली वाट पाहता? काँग्रेसचा संतप्त सवाल
अकोला : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
अकोला येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाष्ट्रातील सर्व निर्णय अमित शाह हेच घेत असतात, ते सुपर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करायला हवी होती पण तसे झाले नाही तसेच अहिल्यानगरच्या कार्यक्रमातच मदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते. मुख्यमंत्री दिल्लीला गेले पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही तर सुरजागडच्या खाणीतून जास्त मलई कशी मिळवता येईल हा प्रस्ताव घेऊन ते दिल्लीला गेले आणि शेतकऱ्यांसाठी मदत न घेतात हात हलवत परत आले.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाच्या हुकूमशाही विरोधात मविआ व इंडिया आघीडीची स्थापना झालेली आहे, नरेंद्र मोदी व भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा त्यामागचा हेतू होता तसेच संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा संकल्प त्यामागे होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिलेले आहेत, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
अमरावती विभागाची आढावा बैठक संपन्न
अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी, संघटन मजबूत करणे यासह विविध प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी वाशिम जिल्हा अध्यक्ष आमदार अमित झनक, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री सुनिल देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, किशोर कान्हेरे, दिलीप सरनाईक, डॉ. झिशान हुसेन, हिदायत पटेल, प्रदेश सरचिटणीस महेश गणगणे, माजी आमदार बबन चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.