शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा; ऊस बिलातून पैसे कपातीच्या निर्णयावरुन सतेज पाटलांची टीका
कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. सरकारच्या या जीझिया कराचा आपण निषेध करत असल्याचेही त्यांनी म्हटले.आमदार सतेज पाटील हे आज जिल्हा काँग्रेस कमिटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करून ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत. यामधील पाच रुपये हे पूरग्रस्तांसाठी दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रकार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले. यावरून सरकारची दिवाळखोरी समोर आली असल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला. शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने त्यांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या लोकप्रिय योजना थांबवाव्यात मात्र शेतकऱ्यांना मदत करावी. ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने जिझिया कर होता त्या पद्धतीने हा कर लावला जात आहे. त्याचा आपण निषेध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मराठवाड्यातील पूरग्रस्ताना केंद्राकडून अजूनही मदतीची घोषणा नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायच्या आधी आठ दिवस मदतीची घोषणा होईल. कारण भाजपला हा सर्व खेळ निवडणुकीसाठी वाटतो, अशी घणाघाती टिकाही त्यांनी केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून, आमदार जयंत पाटील यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीवर टीका होत असल्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी आमदार पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला किंवा तंबी दिली की नाही याबाबत शंका असल्याचेही त्यांनी सांगितले. जर सल्ला दिला असता तर अशा पध्दतीने आमदार पडळकर यांनी टीका केली नसती. भाजपने नोटीस पाठवली असेल तर सांगावी. महत्त्वाचे विषय बाजूला कसे जातील यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केले जातात. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बोलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विषय बाजूला पडावा यासाठी पडळकरांचे वक्तव्य हा एक षडयंत्राचा भाग असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.
पूरग्रस्त शेतकऱ्याला सरकारने प्राधान्याने मदत दिली पाहिजे. मात्र सरकारचे प्राधान्यक्रम बदलत चालले आहेत. त्यामुळेच वोट चोरीसारखा प्रकार समोर येत आहे. जनतेचे मत घ्यायचे नाही आहे. पाहिजे तशी भाजपला निवडणूक जिंकायच्या आहेत. लोक या सर्वांच्या विरोधात उठाव करतील. सरकार चालवायला त्यांना जमत नसेल तर त्यांनी विरोधी पक्षांना बोलवावे. आम्ही त्यांना कशाप्रकारे निधी उभारायचा याची सूचना देऊ. शेतकऱ्यांकडे पैसे वळवा, अशी मागणीही त्यांनी केली.