
Crime News: "शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?" मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विशाल माणिक बाविस्कर हे बांधकाम व्यावसायिक असून दासुमन नगर, मराठा सेक्शन-३२, उल्हासनगर-४ येथे राहतात. ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास ते आपले मित्र कुणाल बाविस्कर आणि जयेश मोरे यांच्यासोबत मराठा सेक्शन येथील शिवसेना शाखेत उपस्थित होते. याचवेळी चिराग राकेश यादव तिथे आला आणि विशाल बाविस्कर यांच्याशी वाद घालू लागला.
आरोपानुसार, चिरागने विशाल यांना सांगितले की, त्यांनी त्याचे काका आणि नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचा फायदा घेतला असून, त्यांच्यामुळेच त्यांना शाखाप्रमुख पद मिळाले आहे. याच मुद्द्यावरून आरोपीने विशाल यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
या वादानंतर विशाल बाविस्कर यांनी नगरसेवक चंद्रशेखर यादव यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पुतण्याला घरी बोलावून विशाल यांच्यासमोरच त्याला थप्पड मारत फटकारले होते. या प्रकारानंतर दोघांमधील अंतर्गत तणाव आणखीच वाढल्याचे बोलले जात आहे.
याच वादाचा राग मनात धरून नाराज झालेल्या चिरागने ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुमारे १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान विशाल बाविस्कर यांना लक्ष्य केले. मराठा सेक्शन परिसरातील आशीर्वाद हॉस्पिटलच्या गेटसमोर, जिजामाता गार्डनजवळ आरोपी हातात चाकू घेऊन पाठीमागून आला आणि त्याने विशाल यांच्या पाठीवर चाकूने अनेक वार केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या दोन्ही मनगटांवरही वार करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या जीवघेण्या हल्ल्यात विशाल बाविस्कर गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. क्षीरसागर करीत आहेत. पोलिसांकडून फरार आरोपी चिराग राकेश यादव याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमधील स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस तपासात यामागील नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: उल्हासनगरमधील मराठा सेक्शन येथील शिवसेना शाखाप्रमुख विशाल माणिक वाविस्कर यांच्यावर हा हल्ला झाला आहे.
Ans: शाखाप्रमुख पद मिळवण्यावरून आणि नगरसेवकाचा फायदा घेतल्याच्या संशयातून हा वाद झाला होता.
Ans: नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचे पुतणे चिराग राकेश यादव याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.