पैसे दे, नाहीतर तुला...; सराईत गुन्हेगाराकडून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी
पुणे : सराईत गुन्हेगाराने दादागिरी करत एका व्यावसायिकाला दुकान चालविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत धक्कबुक्की केली आहे. वेळोवेळी दमदाटी करून १५ हजार ८०० रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सराईताला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज मैनुद्दीन कुरेशी (वय २८, रा. भवानीपेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमप्रकाश चौधरी (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार चौधरी यांचे स्ट्रीट कॅम्प येथे महादेव ट्रेडर्स शॉप नावाचे दुकान आहे. आरोपी कुरेशी हा सतत त्यांच्या दुकानावर जावून शिवीगाळ करत होता. तुला दुकान चालवायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील असे बोलून तो चौधरी यांना सतत धमकावत होता. त्यातूनच त्याने चौधरी यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करून आजपर्यंत १५ हजार ८०० रुपये जबरदस्तीने घेतल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तरटे करीत आहेत.
मोबाईल हिसकावला
पाळीव श्वानासोबत फेरफटका मारण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार रात्री अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी कर्वेनगर येथील ३४ वर्षीय व्यक्तीने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री तक्रारदार हे त्यांच्या पाळीव श्वानासोबत कर्वेनगर येथील शीप्रा सभागृह परिसरात फिरत होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.