सासरच्या मंडळींनी केली १० लाख रुपयांची मागणी
किनवट : किनवट तालुक्यातील मोमीनपुरा येथे राहणाऱ्या एका मूकबधिर विवाहितेवर तिच्या सासरच्यांनी 10 लाख रुपयांच्या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 वर्षीय शबनम तफीयोदीन काजी या पीडित महिला असून, त्या मूळ नांदापुर (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील आहेत.
सध्या त्या मोमीनपुरा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० मे २०२० पासून त्यांच्या सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ होत होता. शबनम या मूकबधिर असूनही, सासरच्यांनी त्यांना माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला. पैशांसाठी त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा अमानवी छळाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : अद्याप प्रतीक्षाच ! पंढरपुरात साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात; डॉक्टर-कर्मचारी पदांची मंजुरी अडकली लालफितीत
पती तकीयोदीन सलीमोदीन काजी, सासू बिबी सलीमोदीन काजी, सासरे सलीमोदीन काजी, भाऊ कलीमोदीन सलीमोदीन काजी, जाऊ अंजुम कलीमोदीन काजी, भाऊ खयुमोदीन सलीमोदीन काजी, जाऊ सलमा खयुमोदीन काजी, देवर अझीमोदीन सलीमोदीन काजी आणि देवराणी फराना अझीमोदीन काजी यांचा समावेश आहे.
कठोर कारवाई करा
शबनम यांनी किनवट पोलीस ठाण्यात इंटरप्रिटरच्या मदतीने तक्रार दाखल केली. तक्रार उशिरा दाखल होण्याचे कारण म्हणजे त्यांनी आजच पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली, असे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल वाडगुरे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. या गंभीर प्रकरणामुळे किनवट परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
पीडितेला न्याय मिळावा
सामाजिक संघटनांनी पीडितेला तातडीने न्याय मिळावा, यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. मूकबधिर महिलेवर झालेल्या अत्याचाराने समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला त्रास; छळ हिंगोलीत पण तक्रार पश्चिम बंगालमध्ये, जाणून घ्या प्रकरण नेमकं काय?