घरफोडी करणाऱ्याला जालन्यात जाऊन पकडले; डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता भांडारकर रस्त्यावरील एका बंगल्यात घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. गणेश प्रकाश आव्हाड (वय २०, रा. शासकीय रुग्णालयासमोर, घनसांगवी, जालना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी यांनी ही कामगिरी केली.
भांडारकर रस्त्यावर एका व्यावसायिकाचा बंगला आहे. व्यावसायिक व कुटुंबीय विवाह समारंभानिमित्त बाहेरगावी गेले होते. १४ डिसेंबर रोजी आव्हाड बंगल्यात शिरला. बंगला बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रसाधनगृहाच्या खिडकीतून तो आत शिरला. कपाटातील दागिने चोरून आव्हाड पसार झाला. या प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासात आव्हाडने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. आव्हाड जालन्यात पसार झाला. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्याला जालन्यातून ताब्यात घेतले. आव्हाडने त्याची आई आणि मावशीच्या मदतीने घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती तपासात मिळाली.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरेंकडून नागरिकाला मारहाण; उचलून आदळलं, डोकं फोडलं अन्…
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.