सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला ही मारहाण केली आहे. चांदेरे यांनी रौंदळ यांना उचलून जमीनीवर आदळलं आहे. शिवाय त्यांचं डोकं फोडल्याची माहिती देखील मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
दमानिया यांचा निशाणा
अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही? बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे, राजकारणाच्या जीवावर दादागिरी. हा पुरावा बास का आणि पुरावे पाहिजे गुन्हा दाखल करायला ? काय एक्शन घेणार तुम्ही? तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात आणि बीड चे देखील आहात. तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा? असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बांबुराव चांदेरे हे माजी नगरसेवक असून ते पुणे महानगरपालिकेच्या समितीचे माजी अध्यक्ष आहेत. चांदेरे यांनी विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने त्यांचा हा व्हिडीओ शूट केला त्यालासुद्धा ते दमदाटी करताना दिसले. जमिनीच्या वादामधून त्यांनी हा मारहाण केल्याची माहिती समजत आहे. ज्यावेळी मारहाण झाली तेव्हा अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. या व्हिडीओवरून राष्ट्रवादीचे नेते दादागिरी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा : बारामती हादरली! भांडण सोडवणं पडलं महागात; तरुणावर कोयत्याने वार