धनंजय देशमुख यांच्या सरपंच साडूची तरूणाला बेदम मारहाण; शेतात नेत लाठ्या-काठ्यांनी...
बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अशातच बीडमध्ये आणखी एक मारहाणीची घटना समोर आली आहे. यामध्ये चार-पाच जणांच्या टोळक्याकडून एका तरूणाला लाठ्या-काठ्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये धनंजय देशमुख यांचा साडू असल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यात आता बीडमध्येच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावात असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा बेडूकवाडी गावचा सरपंच दादा खिंडकर असल्याचे पुढे आले आहे. दादा खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे. आधीच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.
मारहाण करणाऱ्यांमध्ये पोलिस?
पीडित तरुणाला या तरुणांनी शेतात नेत बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्यांमध्ये पोलीसदेखील असल्याचा संशय आहे. कारण मारहाण सुरु असताना, ‘नाना तुम्ही पोलीस आहात पोलीस, तळपायावर मारा तळपायावर,’ असे आवाज ऐकू येत आहेत. त्यामुळे या मारहाणीत पोलिसांचाही सहभाग होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यादृष्टीने आता पोलिसांकडून तपासही सुरु केला जाणार आहे.
कायदा सर्वासाठी समान : धनंजय देशमुख
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. कायदा सर्वासाठी समान आहे आणि या व्हिडिओबाबत ज्यांचा व्हिडिओ आहे तेच प्रतिक्रिया देतील. कोणीही असो नातेवाईक असो किंवा कोणी कायदा समान आहे. त्यात योग्य ती कारवाई केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा
दादा खिंडकर बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला बेल्ट, पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा आहे. तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीचा व्हिडीओ बोकुडवाडी गावातील असल्याची माहितीही समोर आली आहे.