
नशेत तरुणाने केला मजुरावर ब्लेडने हल्ला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मजुरावर दारुच्या नशेत असलेल्या एकाने ऑपरेशन ब्लेडने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना हसूल परिसरातील जहांगीर कॉलनीत घडली.
अमित अदमाने (वय २०, रा. जहांगीर कॉलनी, हर्सल) असे ब्लेडने हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद शहारुख सय्यद जाहेद (वय ३६, रा. जहांगीर कॉलनी, हसुल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २ डिसेंबर रोजी दुपारी फिर्यादीच्या घरासमोर पापासेठ या व्यक्तीस आरोपी अमित अदमाने हा दारूच्या नशेत उभा राहून शिवीगाळ करीत होता. हा प्रकार पाहून फिर्यादी शाहरुख हे भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र, किरकोळ कारणावरून आरोपी संतापला आणि त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
हेदेखील वाचा : Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव
याच भांडणादरम्यान आरोपी अमित अदमानेने आपल्या जवळील ऑपरेशन ब्लेडने फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या बाजूला वार केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. याप्रकरणात हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
आरपीआय पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
कर्जत शहरातील रहिवाशी आणि आरपीआय आठवले पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांना कर्जत बुद्धनगर येथे चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. डाळिंबकर यांना प्रथम जातीवाचक शिवीगाळ आणि नंतर मारहाण करण्यात आली. याबाबत कर्जत मध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने जमले असून तणाव निर्माण झाला आहे. संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.
हेदेखील वाचा : Nanded Crime News : नांदेड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा; वाढते खून-दरोडे बनले आहेत चिंतेचा विषय