crime (फोटो सौजन्य: social media )
नागपूर: नागपूर शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. यात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. नामदेव बरडे (वय 70 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर लता बरडे हे मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याची आत्महत्या, राजकीय दबावाची शंका; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, टोकाचे पाऊल उचलणाऱ्या बरडे दाम्पत्याची ब्रह्माणी शिवारात दोन एकर शेत आहे. सकाळी शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर काल (14 सप्टेंबर) दुपारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक आणि पथ संस्थेचे कर्ज झाले होते. त्यामुळे बरडे दाम्पत्य तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार
दरम्यान वेगवेगळे गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटना जरीपटका आणि यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पहिली घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत २० वर्षीय तरुण आवेश शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली व नंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीला ती अल्पवयीन आहे हे माहित होते, तरीही तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नासाठी दबाव आणला असता आरोपीने निसटण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या एका घटनेत जरीपटका पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुजल गणवीर याला अटक केली. पीडित आणि आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. पीडितेला तिच्या दोन महिन्यांच्या गर्भधारणेबद्दल कळताच आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने गर्भपातासाठी ४०००० रुपये दिले आणि लेखी करार केला. पण, १० सप्टेंबर रोजी आरोपी आणि त्याची आई पीडितेच्या घरी गेले आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला धमकावले. पीडितेच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यालाही मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सरू केला.