संग्रहित फोटो
सांगली : जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. अवधूत अशोक वडार (वय २७, रा. इस्लामपूर) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीतून समोर आले आहे.
दरम्यान, वडार यांच्या नातेवाईकांनी राजकीय दबावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे.
इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या सहा-सात वर्षांपासून जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपासून ते सतत कामाच्या तणावात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व राजकीय दबाव असल्याचे ते सांगत होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी ते जत येथून निघाले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
नदीपात्रात आढळला मृतदेह
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. स्पेशल रेस्क्यूच्या जवानांनी नदीपात्रात पुलाखाली उतरून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह जत पंचायत समितीकडे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वडार यांच्या इस्लामपूर व जत येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. या प्रकरणाचा सांगली शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
22 वर्षीय तरुणीची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून एक महत्त्वाची माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, ‘तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.’ असे असूनही, तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून 25 कॉल आले होते.