आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे सर्व पीक वाहून गेले. त्यामुळे आता मुलाचे पुढचे शिक्षण व घरातील सर्व कामे आर्थिक विवंचणेतून खोळंबतील. या विचारांनी मागील दोन दिवसांपासून तणावात असलेल्या मधुकर सर्जेराव पळसकर (रा. मौजे बकापूर) यांनी सोमवारी (दि.२९) रात्री उशिरा शेतातील विहिरीजवळ झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्यांना मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत पश्चात पत्नी, एक मुलगा, मधुकर पळसकर यांच्या तीन विवाहित मुली असा परिवार आहे. याचा अधिक तपास हवालदार सुनील सुरासे करत आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मधुकर यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांनी गावातील अनेक मंडळीशी त्या अनुषंगाने संवाद साधला होता. त्यांचा लहान मुलगा हैद्राबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. त्यास त्यांनी रात्री उशिरा फोन करून ‘माझ्या छातीत दुखत असल्याने तुझी आठवण आली’ असे म्हणून संवाद साधला.
हेदेखील वाचा : धनगर आरक्षणासाठी 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
त्यानंतर पत्नीला फोन करून मी गावातील एका जणाकडून १० हजार रुपये घेतले आहे. घरातील पैशातून त्याला ते उद्या परत द्यायचे आहे, असे सांगितले. रात्री उशिरा शेतातून असा फोन आल्याने पत्नी घाबरली. त्यामुळे त्यांचा शोध घेणे सुरू झाला, रात्रीच्या अंधारात ते मिळून आले नाही. मात्र, सकाळी त्यांच्याच शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.