crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सोलापूर: सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात अनमोल केवटे (रा. मंद्रुप, जि. सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली भोसले (रा. अंत्रोली, जि. सोलापूर) या गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
Thane News : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अपघात, 7व्या मजल्यावरून पडून स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू
नेमक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी लातूर येथे आले होते. बैठकीनंतर जेवण करून ते सोलापूरच्या दिशेने परतत होते. खाडगाव रोडवर पाच नंबर चौकाजवळ कार आणि जीप (MH-26/V-2356) यांच्यात ओव्हरटेक करताना कट लागला. यावरून शिवीगाळ आणि दमबाजी झाली. पुढे काही अंतरावर जीप आडवी लावून हल्लेखोरांनी कार अडवली.
वाद चिघळताच अनमोल आणि सोनाली कारमधून उतरले. यावेळी हल्लेखोरांनी धारदार चाकूने अनमोलवर तुटून पडत गळ्यावर, मानेवर आणि पोटात वार केले. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर सोनालीवरही हल्ला करत तिच्या छातीत तीन वार व पाठीवर दोन वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत ती जमिनीवर पडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता
अनमोल केवटेचे मूळ गाव मंद्रुप, जि. सोलापूर, तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. त्याच्यावरती पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मारामारी, खंडणी वसुली यासांरखे गुन्ह्यांची नोंद आहे.त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. समितीच्या लातूर मेळाव्यासाठी आलेला होता. तर जखमी सोनाली भोसले मूळ गाव अंत्रोली, जि. सोलापूर आहे. विवाहित आहेत, त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून समितीत कार्यरत आहेत. लातूर मेळाव्यासाठी अनमोलसोबत सोनाली भोसले आली होती.
संशयित आरोपी कोण?
मुख्य आरोपी विष्णू मामडगे तो क्रुझर जीपचा मालक आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर काही गुन्हे आहेत त्याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे, शुभम पतंगे, वैभव स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विष्णू आणि मंथन मामडगे फरार आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या. शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी विष्णू मामडगे व त्याचा साथीदार मंथन मामडगे यांचा शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत.
धक्कादायक ! घरात कोणी नसल्याची संधी साधत तरुणाची हत्या; चाकूने गळा चिरला अन्…