
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अचानक आज गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी अचानक गोळीबार केला असून मुंबईच्या बांद्रा पूर्वमध्ये खेरवाडी परिसरात ही घटना घडलीये. या घटनेनंतर बाबा सिद्दिकी यांना उपचारासाठी जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र छातीत गोळी घुसल्यामुळे त्वरीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्तवाहिनीवर सांगण्यात येत आहे.
झिशान सिद्दिकी आमदार असणाऱ्या भागात त्यांच्या वडिलांवर अर्थात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अजूनही कोणतेही कारण कळले नसून हा हल्ला कोणी केला आहे याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने उचललेली नाही. दरम्यान वृत्तानुसार साधारण 9.15 च्या सुमारास ही घटना बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या राम मंदिराजवळ घडली असल्याचे समोर आले. निर्मल नगर भागामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच संधी साधत बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आता मिळाली आहे.
काय घडले?
बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यातील 1 गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली असल्याचीही माहिती मिळत आहे. तसंच बाबा सिद्दीकी यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांचा मृत्यू झाल्याचेही आता समोर आले आहे. वृत्तवाहिन्यांमध्ये सांगण्यात आलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालाय.
दोघांना अटक
सध्या बाबा सिद्दीकी यांना लिलावती रूग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींना अटक केली असल्याचेही आता समोर आले आहे. मात्र त्यानंतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच तपास सुरू होणार आहे. दोन आरोपी नक्की कोण आहेत आणि त्यांनी हल्ला का केला आहे? याबाबत आता लवकरच विचारपूस सुरू होईल. मात्र बाबा सिद्दीकी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून राजकारणात मोठी हळहळ व्यक्त केली जातेय.
बाबा सिद्दीकी कोण होते?
बाबा सिद्दिकी हे बांद्र्यातील मोठं प्रस्थ असून पूर्वी काँग्रेस पक्षात होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात त्यांनी प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत चेहऱ्यांपैकी एक असून ईद दरम्यान बाबा सिद्दिकी यांची ईफ्तार पार्टी हा संपूर्ण मुंबईसाठी नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बडे राजकारणी हजेरी लावत होते. तर सलमान आणि शाहरुखमधील दुरावादेखील त्यांच्या ईद पार्टीलाच दूर झाला होता. गेले अनेक वर्ष राजकारणातील मोठं नाव असणारे बाबा सिद्दीकी यांच्यावर कोणी आणि का हल्ला केलाय? याचं गूढ अजून उकललेलं नाही.