
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुणे शहरातून एक फसवणुकीची मोठी घटना समोर आली आहे. कोथरुड येथील एका ५७ वर्षीय महिलेला दहशतवादी हल्लयात गोवण्याची भीती दाखवून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.
कशी झाली फसवणूक?
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला २५ सप्टेंबर रोजी एका अनोळखी नंबर वरून फोन आला. त्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनतर त्या भामट्याने महिलेला म्हंटले की तुम्ही, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्या’दरम्यान शस्त्रास्त्रांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे खोटे सांगितले. तसेच या महिलेला आता तात्काळ आम्ही पोलीस कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे.
त्यांनतर लगेचच दुसऱ्या एका व्यक्तीने कॉल केला. तो त्याचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने महिलेचे बँक खाते एका मोठ्या ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात वापरले गेले असल्याचा बनाव केला. आरोपींनी अत्यंत योजनाबद्धरित्या ‘खाते तपासणी करण्याच्या नावाखाली महिलेकडून तिच्या आर्थिक व्यवहारांचे सर्व तपशील घेतले आणि तिला एका विशिष्ट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले.
संपर्क न झाल्याने आले लक्षात
पीडित महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेऊन कोणताही विचार न करता तिच्या खात्यातून तब्बल ५१ लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले. पैसे हस्तांतरित झाल्यानंतर महिलेला अपेक्षित परतावा मिळाला नाही. तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींशी संपर्क झाला नाही. तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३०८ (खंडणी), ३१८ (फसवणूक), ३१९ (तोतयागिरी करून फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आधार घेत महिलेच्या मनात भीती निर्माण करून ही फसवणूक करण्यात आली.