
ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे...
नाशिक : शेअर मार्केटमधून अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी शहरातील व्यावसायिक, उद्योजक व सेवानिवृत्त नागरिक अशा सहा जणांकडून तब्बल १ कोटी ४३ लाख ७७ हजार रूपये उकळले. फसवणुकीतील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यातून वर्ग झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या फिर्यादीनुसार, १६ जून २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत संशयितांनी फिर्यादीसह पाच साक्षीदारांना विविध भारतीय व विदेशी मोबाईल क्रमांक, तसेच व्हॉट्सअॅप व इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच ‘Puppy Rally 32’ या कथित स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरील lover.clock.runtime com.klsmepks.dalinoye असे अॅप डाऊनलोड करण्यास प्रोत्साहित केले. या अॅपच्या मदतीने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत अधिकचा नफा मिळेल, असा दावा केला. त्यासंबंधी काही गुंतवणुकीवर अॅपमध्ये ‘नफा’ झाल्याचे आकडे दाखवण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसल्यानंतर संशयितांनी टप्प्याटप्प्याने अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.
हेदेखील वाचा : Vikram Bhatt Fraud News: विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीचा आरोप, पोलिस तक्रार दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण?
नफा काढण्यासाठी ‘चार्जेस’, ‘टॅक्स’, ‘क्लिअरन्स’, ‘सीएचसीपी सपोर्ट फी’ अशा विविध कारणांनी पुन्हा-पुन्हा पैसे वर्ग करण्यास सांगितले. पैसे भरूनही पैसे मिळत नसल्याने तक्रारदारांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. फिर्यादीसह साक्षीदारांकडून रक्कम विविध बँक खात्यांमध्ये, तसेच आंतरराष्ट्रीय ‘पेमेंट गेट वे’द्वारे जमा करून घेण्यात आली. काही रक्कम थेट विदेशी क्रमांकांशी जोडलेल्या सपोर्ट सिस्टीममार्फत घेतली गेली. हजारांहून अधिक बोगस बँक खात्यांतून व्यवहार झाल्याचे समोर येते आहे.
नाशिककरांच्या कोट्यवधी रूपयांवर सातत्याने डल्ला
सायबर चोरट्यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून वेळावेळी कोट्यवधी रूपये उकळल्याचे समोर येते आहे. अनेकदा फिर्यादी तक्रा देण्यासाठी सुद्धा पुढे येत नाही. सातत्याने घडणाऱ्या या गुन्ह्यांना रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सेबीकडे नोंदणी असलेल्या संस्थांनाच प्राधन्य द्यायला हवे.
संगणक अभियंत्याची 43 लाखांची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत, ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.