संग्रहित फोटो
चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औंध येथे जुन्या वादातून १९ वर्षीय विघ्नेश चौगुले (वय १९) याच्यावर हल्ला केला. संगणमत करून त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुरूवारी दुपारी ही घटना राजीव गांधी ब्रीज येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद महेंद्र घोरपडे (वय १९), अनिकेत किशोर लसंडगे (वय १९, रा. औंध) यांना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विघ्नेश याच्या मित्राने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा प्रकार जुन्या वादातून घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काका पुतण्यावर वार, दहशतही माजवली
बिबवेवाडी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने काका-पुतण्यावर वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह पाच जणांना पकडले आहे. हल्यानंतर टोळक्याने हत्यारे हातात घेऊन ते हवेत फिरवत परिसरात दहशत देखील माजवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज उर्फ सोन्या लक्ष्मण जठार (वय १९, रा. बिबवेवाडी), गणेश बाळु कोळी (वय २१), लक्ष्मण उर्फ लक्ष्या श्रीधर जठार (वय २२) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तक्रारदार व त्यांचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रामभाऊ गरज करत आहेत.
गाडीला कट मारल्यावरून दहशत
गाडीला कट मारल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या दोन साथीदारांनी तरुणाच्या घराजवळ तसेच परिसरात हातात कोयते घेऊन ते हवेत फिरवत दहशत माजविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी निवृत्ती मुक्ताराम मोरे (वय २१, रा. नर्हे) तसेच रोशन राजु लांडगे (वय १९, रा. धायरी) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याबाबत नांदेड सिटी पोलिस ठाण्यात १९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तरुण धायरी येथून जात असताना खडक चौकात त्याच्याकडून आरोपींच्या गाडीला कट लागला. यावरून त्यांनी वाद घातला. तसेच गाडीला कट का मारला म्हणत त्याला मारण्यासाठी अंगावर धावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच्या परिसरात जाऊन दहशत माजवली. अधिक तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.






