पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस अनेक गुन्हेगारीचे अनेक प्रकार घडत असल्याचं आपणास दिसून येत आहे. अशातच आता घरासमोर गांजा ओढणाऱ्या सराइतांना हटकल्यानंतर त्यांनी दुचाकींची जाळपाेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर रस्त्यावरील वाघोली भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौघांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गणेश दांडे, श्रृतिक येरकर, सूरज पवार, समीर पिल्ले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुधीर लक्ष्मण पेटकर (वय ३४, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दांडे, येरकर, पवार, पिल्ले हे पेटकर यांच्या घराच्या परिसरात गांजा ओढत होते. पेटकर कुटुंबीयांना त्रास झाल्याने त्यांनी आरोपींना गांजा ओढू नका, असे सांगितले होते. शनिवारी मध्यरात्री पेटकर कुटुंबीय गाढ झोपेत होते. त्यावेळी घराच्या परिसरातून जळण्याचा वास आला. पेटकर यांनी घराबाहेर डोकावून पाहिले. तेव्हा दुचाकी पेटवल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. घरासमोर गांजा ओढण्यास मनाई केल्याने आरोपींनी दुचाकी पेटविल्याचे पेटकर यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्याखाली नाशिकमध्ये गाड्यांची जाळपोळ केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 15 मे रोजीच्या मध्यरात्री एका दुचाकीवरून तीन युवक जुने नाशिक परिसरात आले. त्यातील एकाने परिसरात उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकीवर पेट्रोल ओतलं आणि दुसऱ्याने आग लावत तेथून फरार झाले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यानं बाजूला पार्क केलेल्या दुचाकीसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दरम्यान गाड्या जाळपोळीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.