Photo Credit- Social Media Beed Crime: ...म्हणून आमचं कारागृह बदललं ? त्या राड्याबाबत महादेव गितेचा गौप्यस्फोट
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीचा सदस्य महादेव गित्ते यांच्यात बीड जिल्हा कारागृहात 31 मार्च रोजी झालेल्या मारहाणाच्या प्रकाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कराड आणि गित्ते टोळीमध्ये कोणतीही मारहाण झाल्याचे नाकारले होते. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
महादेव गितेने यासंदर्भात काही दावे केले आहेत. वाल्मिक कराडने तुरुंगातील त्याच्या साथीदारांना दिलेल्या सूचनेनंतर सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. या संपूर्ण घटना तुरूंगातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे., असा दावा महादेव गिते याने केला आहे. तसेच, ते फुटेज तपासून संबंधितांवर गुन्हा दाखल कऱण्यात यावा,अशी मागणीही त्याने केली आहे.
दरम्यान, महादेव गिते आणि वाल्मिक कराडच्या गॅंगमध्ये मारहाण झाल्याचा दावा बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने फेटाळून लावला होता. मात्र या घटनेनंतर महादेव गिते आणि त्याच्या सहकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवण्यात आले होते. त्यामुळे जर मारहाण झालीच नव्हती, तर मग महादेव गिते यांना दुसऱ्या कारागृहात का पाठवण्यात आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
इतकेच नव्हे तर, महादेव गितेची बीड कारागृहातून इतर कारागृहात बदलाबाबतची कारवाई देखील वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आली होती, असा दावा महादेव गिते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. तसेच, अक्षय आठवले गँगवरही कारवाई करत त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.
बर्फ कारखान्यांना हवामानाचा फटका; मागणी कमी असल्याने उत्पादनात झाली घट
कारागृह प्रशासनाचा अधिकृत दावा काय आहे?
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी सकाळी काही आरोपी फोन कॉलसाठी बराकीबाहेर आले होते. त्याचवेळी राजेश वाघमोडे आणि सुधीर सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या गोंधळाच्या वेळी इतर कैदीही तिथे उपस्थित होते. मात्र, कारागृह प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत सर्वांना वेगळं केलं आणि वाद शांत केला. प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्या घटनेच्या वेळी ना वाल्मिक कराड तिथे होते, ना सुदर्शन घुले. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटा असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे.