'पक्ष्यांचे'ही भरले संमेलन (फोटो - विशाल तरडे)
पुणे शहराबाहेर भरले पक्ष्यांचे संमेलन
थंडीपासून संरक्षण पक्षी दक्षिणेकडे करतात स्थलांतर
जंगलात रंगबिरंगी आकर्षक शिळ घालणाऱ्या पक्षांचे भरले संमेलन
सुनयना सोनवणे/पुणे: शहरात साहित्य, संगीत आणि पुस्तकांचे संमेलन भरले आहे तर शहराबाहेर (Pune) पाणथळ आणि गवताळ जागी नित्य नियमाप्रमाणे यंदाही स्थलांतरित ‘पक्ष्यांचे’ (Birds) संमेलन भरले आहे. कोणताही नकाशा न बघता दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करत शहरालगतच्या विविध पाणवठ्यावर, डोंगरदऱ्यांवर, माळरानांवर परदेशी पक्षांचे ठरलेल्या वेळेत आगमन झाले आहे. जलाशयांवर बदक, करकोचे, माळरानावर शिकारी पक्षी तर जंगलात रंगबिरंगी आकर्षक शिळ घालणाऱ्या पक्षांचे जणू संमेलन भरले आहे.
हिवाळ्यात उत्तर गोलार्धात बर्फ वृष्टी झाल्याने जलाशय, नद्या, तळी गोठतात. जमीन बर्फाच्छादित होते. वनस्पती, किडे कीटकांचा आभाव निर्माण झाल्याने अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. शिवाय रात्र मोठी व दिवस लहान असल्याने अन्न मिळवण्यासाठी पक्षांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे या प्रदेशातील पक्षांना अन्न मिळवणे आणि थंडीपासून संरक्षण करणे यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागते. या काळात उत्तरेकडील करकोचे, नाना प्रकारची वन्य बदके, शिकारी पक्षी, छोटे कीटक भक्षी, वटवटे यांसारखे पक्षी हजारोंच्या संख्येने दक्षिणेकडे प्रवास करतात, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गयात्री या पर्यावरण संस्थेचे संस्थापक विशाल तरडे यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
पक्षी स्थलांतर कसे करतात?
हे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्याकडे येतात. याबद्दल माहिती सांगताना तरडे म्हणाले, स्थलांतराच्या या प्रवासात पक्षी गृह नक्षत्रांचा मागोवा घेत मार्गक्रमण करतात. पक्षांचा हा प्रवास दिवसा सूर्य आणि रात्री नक्षत्रांच्या मदतीने होत असतो. तसेच पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, ध्वनितरंग, वायुलहरी, उंच पर्वत, मोठे जलाशय सरोवरे यांचा पक्षांना मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग होतो.
Navarashtra Special: पुणे सर्वांचे लाडके; हिवाळ्यात बनले स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान
संमेलनातील आलेत हे पक्षी!
चक्रांग बदक, पाणभिंगरी, चक्रवाक, भिवई, थापट्या ही बदके, दलदल ससाणा, तूतवार, पिंपळा धोबी, पांढरा धोबी, राखी धोबी, पाणलावा, रफ, रक्तसुरमा, गॉडविट, नामा, शेकाट्या, नदीसुरय, राखी बदक, चित्रबलाक, राखी बगळा, मोर बगळा, मध्यम बगळा, छोटा बगळा, वंचक, जांभळा बगळा, पांढरा शराटी, काळा शराटी, ताम्र शराटी, रात बगळा कंठेरी, चिखल्या, सर्जा, छोट्या खंड्या.
पुणे आणि त्याचा परिसर हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जैवविविधतेचा पट्टा आहे. सह्याद्री पर्वतरांग, मुळा-मुठा नदी, पवना, इंद्रायणी, भीमा नदी, तसेच पाषाण, खडकवासला, पिंपरी-चिंचवड, भिगवण, कवडीपाट आणि मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्याजवळील पाणथळ क्षेत्रे ही अनेक स्थलांतरित (प्रवासी) पक्ष्यांची हिवाळी निवासस्थाने आहेत.






