
एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर...
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता एकतर्फी प्रेमातून तरुणीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कॉलेजमध्ये मैत्री झाली म्हणून सुरुवातीला साधी ओळख असलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुलीचे आयुष्य अक्षरशः उद्धवस्त केले.
हेमंत संजय काकड (२२, रा. सातारा परिसर) असे या तरुणाचे नाव आहे. हेमंत हा एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करायचा. इतकेच नाहीतर तिला धमक्याही द्यायचा. सातत्याने होत असलेल्या त्रासाने हुशार असलेल्या मुलीला बारावीतच शिक्षण सोडून घरी बसण्याची वेळ आली. कुटुंबाने शहर सोडून हिरापूर शिवारात आश्रय घेतला होता. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. ‘तुझे लग्न होऊ देणार नाही, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारून टाकेन’, अशा धमक्या तो देत राहिला.
हेदेखील वाचा : Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना
दरम्यान, अखेर चिकलठाणा पोलिसांत तक्रार होताच आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. हेमंतला अटक करण्यात आली आहे. त्याला सोबत प्रकाश रतन जोगदंड याची असल्याचे समोर आले आहे.
चिकलठाणा परिसरात राहते पीडिता
फिर्यादी 21 वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंब तीन महिन्यांपूर्वीपर्यंत चिकलठाणा भागात राहत होते. मुलगी बारावीत शिकत असताना ती एक नामांकित क्लासमध्ये नीट किंवा जेईईच्या तयारीत होती. डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे तिचे स्वप्न तिने तेव्हाच पाहिले होते. मात्र, त्याच कॉलेजमध्ये शिकणारा हेमंत काकड तिचा सतत पाठलाग करू लागला. कॉलेजपासून घरापर्यंत माग काढणे, तिच्या भावावरही नजर ठेवण्यासाठी साथीदारांना लावणे अशा कृत्यांमुळे कुटुंब दहशतीत आले.
आरोपीवर यापूर्वीही मारहाणीचा गुन्हा
कुटुंबाने शहर सोडण्याचा निर्णय घेऊन हिरापूर शिवारात वास्तव्यास गेले. मुलीला शिक्षण थांबवून घरी बसावे लागले. तरीही आरोपीचा पाठलाग सुरूच होता. तो तिच्या घरापर्यंत जाऊन ‘तुझे लग्न होऊ देणार नाही’, अशा धमक्या देत असे. अंगाला स्पर्श करून विनयभंग, तसेच फोटो व्हायरल करण्याची दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्नही उघड झाला आहे. पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. रविवारी पोलिसांनी हेमंत काकडला अटक करून त्याच्याकडून बुलेट आणि मोबाईल जप्त केले.