संग्रहित फोटो
‘पोलिसांचा खबऱ्या’ असल्याचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, गणेश गुंडाळे याला संशयित आरोपींनी गाठले. तो पोलिसांना गुप्त माहिती देत असल्याचा आरोप करत त्याच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला झालेल्या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. वाद वाढल्यानंतर संशयितांनी जवळील दगड आणि विटांनी गणेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.
मृतदेह पोलीस ठाण्यात आणून आंदोलन
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेशच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईकांनी गणेशचा मृतदेह वसमत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून निदर्शने केली. हत्येतील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आणि आंदोलनात अशा मागण्या होत्या की, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला. नागरिकांचा मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला.
पोलिसांकडून तपास सुरू
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली. दरम्यान, या हत्येमागे नेमके कारण काय होते, हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती आणि पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयाला काही आधार होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.






