Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव – शेतकऱ्याचा खरा मित्र असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात बैलपोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातल्या कॉलेजमध्ये असा पारंपरिक सण साजरा झाल्याने वेगळाच उत्साह दिसून आला.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्जा-राजाची पूजा करण्यात आली. सकाळपासूनच महाविद्यालयाच्या परिसराला वेगळीच झळाळी आली होती.
या दिवशी बैलांना खास सजवलं जातं. इथे पण तसंच झालं. बैलांना रंगीबेरंगी झुली, शिंगांना बेगड, गळ्यात घुंगरांच्या माळा घालण्यात आल्या होत्या. काही बैलांच्या अंगावर रंगाने सुंदर नक्षी काढली होती. त्यांची आरती करण्यात आली आणि उपस्थित सगळ्यांनी त्यांना नमस्कार करून आभार मानले. शेतीमध्ये बैलांचं काम किती महत्त्वाचं आहे, हे आजच्या पिढीला कळावं म्हणून हा कार्यक्रम केला होता.
संपूर्ण परिसरात फुगे, पताका आणि पारंपरिक सजावट केली होती. ढोल-ताशाच्या आवाजात वातावरण एकदम उत्साही झालं होतं. विद्यार्थ्यांनी बैलांसोबत फोटो काढले, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सगळेच प्रमुख लोक आले होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी हे उपस्थित होते.
त्याचबरोबर संचालक सतीश सावके, डॉ. मिलिंद तायडे, प्रा. सुशील चव्हाण, परिचारिका अधीक्षक मनिषा खरात, प्रा. कीर्ती पाटील, डॉ. गुणवंतराव सरादे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्रशासन अधिकारी चेतन चौधरी, देवेंद्र भंगाळे यांच्यासह अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आज ट्रॅक्टर आले, आधुनिक यंत्रं आली तरी बैलाचं महत्त्व कमी झालेलं नाही. बैल हा फक्त प्राणी नाही तर शेतकऱ्याच्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे आपल्या शेती संस्कृतीचा आदर करणं आहे.”
Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ …
विद्यार्थ्यांसाठी वेगळा अनुभवआजकाल बऱ्याच मुलांना शेती आणि बैलपोळा याबद्दल फारशी माहिती नसते. शहरात वाढलेली मुलं तर बैल जवळून बघत पण नाहीत. म्हणून महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला. परंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम कसा साधता येतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.शेती आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलांचं काय स्थान आहे, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावं, त्यांची नाळ आपल्या कृषी संस्कृतीशी जोडली जावी”, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …
विद्यार्थ्यांनी पण या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी बैलांना सजवण्यात मदत केली, तर काहींनी सजावटीची जबाबदारी घेतली. एकूणच काय, तर जळगावच्या या कृषी महाविद्यालयात साजरा झालेला बैलपोळा फक्त एक सण नव्हता, तर शेतीप्रती असलेला आदर आणि आपल्या मुळाशी जोडलेलं राहण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. सर्जा-राजाच्या पूजेने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.






