मित्राला भेटायला जायचंय म्हणून पत्नीला दुचाकीवरून नेलं; घाटात गाडी थांबवली, चाकू काढला अन्...
नांदगाव : पत्नीला घाटात निर्जनस्थळी नेऊन पतीने तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरापासून जवळ परधाडी घाटात उघड झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, गंभीर जखमी पत्नीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पत्नीची प्रकृती गंभीर असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे.
पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून फरार झालेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासात सापळा रचून गजाआड करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चरित्र्याच्या संशयावरुन हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी गोविंद माळी (२०, रा. कोटमगाव विठ्ठलाचे, ता. येवला) या महिलेला घेऊन तिचा पती गोविंद माळी हा गुरूवारी (दि. १२) सायंकाळच्या सुमारास मित्राला भेटायला जायचे आहे, असे सांगत तिला परधाडी घाट परिसरात घेऊन गेला.
दरम्यान, घाटातील निर्जनस्थळी पोहचताच त्याने दुचाकी थांबवून त्याने चाकू काढला. पतीच्या हातात चाकू पाहून राणी प्रचंड घाबरली काय करावे हे तिला सूचत नसताना नराधम पतीने तिच्या गळा, पोट, पाठी आणि कमरेवर सपासप वार केले. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून गोविंद दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
नागरिकांची सतर्कता
काही वेळा नंतर परघडी गावातील काही नागरिक तेथून जात असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली राणी आढळून आली. त्यांनी अगोदर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जखमी राणीला तातडीने ग्रामीण रुग्णालय दाखल केले. रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसांसमोर घडलेल्या घटनेची धक्कादायक माहिती दिली. तिच्या जबाबावरून पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फरार आरोपीचा पोलिसांनी घेतला शोध
त्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी घटनेनंतर तपासाची चक्रे फिरवली असता तो येवल्यात लपून बसल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला शिताफीने पकडून ताब्यात गजाआड केले. सध्या पीडित महिलेवर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत.