
दाम्पत्यामधील घरगुती वाद टोकाला; पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता चंद्रपूरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ही घटना चुनाळा गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
रोशनी उईके (वय २२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रविशंकर उईके (वय २४) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीला राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. रविशंकर व रोशनी हे मूळचे मध्यप्रदेश राज्यातील इटारसी येथील रहिवासी आहे. मात्र, सध्या हते चुनाळा गावात राहतात. पती जेसीबी चालक आहे व त्याला दारूची व्यसन जडले होते.
हेदेखील वाचा : West Bengal Crime : आधी हत्या करायचा, नंतर मृतदेह पाण्याने धुवून खायचा…., बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर
दरम्यान, याच दारूच्या नशेत पत्नी रोशनीसोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात त्याने पत्नी रोशनीचा गळा आवळून खून केला. फिर्यादी राजू शर्मा यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
पैशाच्या वादातून संभाजीनगरमध्ये तरूणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल फोन व पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर, पंढरपुर) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. कासंबरी दर्गा, पडेगाव परिसरातील चौघा संशयितांनी तरुणाच्या पायाला सिगारेटचे चटके देत, हाताच्या नसा कापून गळा चिरत खून केला. मृतदेह जटवाडा परिसरात फेकून दिला. काही तासात छावणी पोलिसांनी आरोपींपैकी एक सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली याला बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित आरोपी छोटा सिराज, जब्बार, कबीर (सर्व रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
हेदेखील वाचा : Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार