आधी हत्या करायचा, नंतर मृतदेह पाण्याने धुवून खायचा...., बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर
उत्तर प्रदेशातील निठारी घटनेसारखीच माणुसकीला धक्का देणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा भागात मानवी मांस खाण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्ती स्मशानभूमीत बांधलेल्या झोपडीत राहत असल्याचे वृत्त आहे. त्याचा मृतदेह कुसर हाटजवळील एका जलाशयात आढळला. तपासात असेही उघड झाले आहे की, अज्ञात व्यक्तीचा गळा आणि मान कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी फिरदौस आलम नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपी दारूच्या नशेत होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हत्येनंतर त्याने मृतदेह पाण्याच्या नळाजवळ नेला, तो स्वच्छ केला आणि नंतर तो लपवून ठेवला. त्यानंतर पोलीस तपासात असेही उघड झाले आहे की आरोपीचा शरीराचे काही भाग खाण्याचा हेतू होता.
चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. दिनहाटा एसडीपीओ धीमान मित्रा यांनी सांगितले की हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आहे. त्यांनी सांगितले की प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपीने मानवी मांस खाण्याच्या उद्देशाने मृताची हत्या केली. हा नरभक्षणाचा दुर्मिळ प्रकार मानला जात आहे.
एसडीपीओंनी सांगितले की पोलिसांना स्थानिक सूत्रांकडून आरोपीबद्दल माहिती मिळाली होती, ज्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. पोलीस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अधिक माहिती उपलब्ध होईल तशी ती शेअर केली जाईल.






