
कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या, नंतर मृतदेह...
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच कौटुंबिक वादातून एकाने सख्ख्या भावाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खुनाचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणण्यात हिंगोली पोलिसांना यश आहे.
हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे रांजना येथे शेत आखाड्यात खुनाची घटना समोर आली. या खुनाचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणण्यात हिंगोली पोलिसांना यश आहे. या प्रकरणात मयताचा सख्खा भाऊच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. १५ जानेवारी रोजी पहाटे रांजना येथील शेत आखाड्यात नवनाथ नामदेव सावळे (वय २५) यांचा डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची माहिती मिळताच हट्टा ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ व फिंगरप्रिंट पथक पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी कोणताही ठोस सुगावा लागत नसतानाही पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
हेदेखील वाचा : Pune Crime: पुण्यात पार्टीचा शेवट रक्तात; चेष्टेच्या वादातून मित्राच्या डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली फेकला आणि…
दरम्यान, पाहणीत आडोशाला रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आली. गोपनीय चौकशीत मयत नवनाथ सावळे व त्याचा धाकटा भाऊ गजानन सावळे (वय २३) यांच्यात घरगुती व शेतीच्या कामावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गजाननच्या संशयास्पद वर्तनाकडे पोलिसांचे लक्ष गेले. त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, सुरुवातीला तो टाळाटाळ करत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मध्यरात्री मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिली.
शेतीच्या वादातून खुनाची कबुली
शेतीच्या कामावरून व घरगुती वादातूनच हा खून केल्याचे त्याने सांगितले. आरोपी गजानन सावळे (रा. रांजना) यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार संग्राम जाधव करीत आहेत.
हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल, लैंगिक शोषणानंतर पीडित महिलेची छतावरून उडी