
रविवारी रात्रीच्या सुमारास तो दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता. दरम्यान, संकुलाबाहेरील रस्त्यावर गाडी वळवत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट काँक्रीट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याची दुचाकी वाहनाखाली अडकली, तर तो काही अंतरावर फेकला गेला. जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अवजड वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. दरम्यान, यापूर्वीही या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मीरा भाईंदर परिसरात दिवसेंदिवस अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या सहा महिन्यात परिसरातील हा तिसरा अपघात आहे. दोन दिवसांपुर्वीच भाईंदर पश्चिम येथील कोस्टल रोड बांधकाम प्रकल्पातील कास्टिंग यार्डमध्ये दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गॅन्ट्री क्रेनला जोडलेला उंच प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात दुपारी सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या कास्टिंग यार्डमध्ये जड गर्डर हलवण्यासाठी गॅन्ट्री क्रेन बसवण्यात आली आहे. या क्रेनच्या वरच्या भागात कामगारांना उभे राहून काम करता यावे यासाठी सुमारे 12 मीटर उंचीवर एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. काम सुरू असताना हा प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने त्यावर काम करणारे दोन्ही कामगार खाली पडले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काशिमिरा परिसरात 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटच्या डंपरखाली चिरडून मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आणि सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.आंदोलनकर्त्यांनी आरएमसी प्लांट तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला होता.