सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता ‘वडापाव’वरून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडापाव अन् पुण्याचे नाते वेगळेच असून, बालेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.
वडापाव गार असल्याने तिघांनी विक्रेत्यावर काचेची भरणी फेकून मारत चहाचा थरमास फेकून देत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. यानूसार अंकुश कोंडीबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात अवैध धंदे सुरुचं; धनकवडीत जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्धवस्थ
पोलिसांच्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साईचौक येथे शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्याठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास ढेबे व त्याचे दोन मित्र सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थरमास खाली फेकून तो फोडला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकूम मारली. यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. गार वडापाववरून मारहाण झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.
मैत्रीणीचा जबडा केला फॅक्चर
मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून मारहाण केली. यामध्ये त्या तरूणीचा जबडा फॅक्चर झाला आहे. मैत्रीण असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून ‘दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?’ अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजी नगरमधील मॉडल कॉलनी परिसरात घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वानवडीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत. दिवाळीपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दुपारी बाराच्या सुमारास तरुणी ही तिच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात असताना रोहनने पाहिले होते. त्यानंतर त्याने रागाच्या भरात तिचा रस्ता अडवून तिला मारहाण केली. त्याचबरोबर, त्याने तिच्या चेहर्यावर बुक्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






