पुण्यात पोलीसांची मोठी कारवाई, बुलेटचे तब्बल 1768 सायलेन्सर नष्ट
पुणे : कर्णकश आवाज काढत फटाक्यांसारखा मात्र, कानठाळ्या बसविणाऱ्या त्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, वेगवेगळ्या भागात कारवाई करुन जप्त केलेल्या १ हजार ७६८ सायलेन्सरवर बुलडोझर चालविला आहे. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतूक केले असून, ही कारवाई आणखीही तीव्र करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर तसेच उपनगरात रात्री-अपरात्री भरधाव वेगाने बुलेटचालक तरूण जातात. त्यांच्या दुचाकीचा वेग देखील भरधाव असतो. तर गाडीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करून त्यातून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. या फटाक्यासारख्या आवाजाने ज्येष्ठ नागरिकांसह सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. अचानक आवाज आल्यानंतर लहान मुल, महिला व ज्येष्ठ नागरिक घाबरतात देखील. परंतु, त्याचीच मजा घेत हे तरुण शहरात सुसाट सुटलेले पाहायला मिळतात. पंधरा ते वीस दिवसांपासून पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात बुलेटचालकांवर कारवाई करुन त्यांचे सायलेन्सर जप्त केले. कर्कश सायलेन्सर नष्ट करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.
त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या १ हजार ७६८ सायलेन्सरवर ‘बुलडोझर’ चालवून नष्ट केले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व वाहतूक शाखेतील अधिकारी उपस्थित होते. फटाक्यासारखा आवाज काढणारे, तसेच चित्रविचित्र आवाज काढणारे सायलेन्सर बसविल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. मॉडिफाय सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांवर यापुढील काळात तीव्र कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेडे यांनी दिला आहे.
कर्कश सायलेन्सरचा वापर करणारे वाहनचालक, तसेच सायलेन्सर विक्री करणारे व्यावसायिक, तसेच सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालकांवर देखील कारवाई केली जाणार आहे.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त
पोलिसांनी २२ बुलेट ताब्यात घेतल्या
पुणे शहरात मुख्य रस्त्यांसह उपनगरात बुलेटला अल्टर करून सायलेन्सर बसवून त्यातून कर्ण कर्कश्य आवाज काढत बुलेट पळविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली एकट्या लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेत २२ बुलेट ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचे सायलेन्सर काढून टाकत त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याप्रमाणेच पुर्ण शहरात अशा बुलेटस्वारांवर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. ज्या गांड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.