पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 'या' भागातून महिलांचे मंगळसूत्र हिसकावले
पुणे : कात्रज परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून पोबारा केला आहे. तर, स्वारगेट परिसरात पीएमपी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या कात्रज परिसरात राहण्यास असून, त्या रात्री दहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील गणपती मंदिरासमोरून पायी चालत जात होत्या. तेव्हा पाठिमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून पोबारा केला.
दुसरी घटना स्वारगेट येथील पीएमपीएल बस स्टॉप येथे घडली आहे. थेरगाव येथील ४० वर्षीय महिला स्वारगेट भागात आलेली होती. त्या सायंकाळी पुन्हा थेरगाव येथे जाण्यासाठी पीएमपी बस स्टॉपला थांबलेल्या होत्या. तेव्हा बस आली असता त्या बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र जबरद्सीने हिसकावून चोरून पोबारा केला. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कात्रजमध्ये घरफोडीही..!
कात्रज परिसरात लुटमारीसोबतच एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज देखील चोरून नेला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात राहण्यास आहेत. १९ ते २३ नोव्हेंबर ते बाहेर गावी गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरून नेला.
धनकवडीतील बंद फ्लॅट फोडला
घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्यानंतर धनकवडीतील बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडण्यात आला आहे. चोरट्यांनी येथून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. चैतन्यनगर परिसरातील हिल व्ह्यु अपार्टमेंटमध्ये तक्रारदार राहतात. त्यांचा फ्लॅट १३ ते १४ दिवसांसाठी बंद होता.