निवडणुकांच्या तोंडावर राज्यात काही ठिकाणी करणी, जादूटोणा यांसारख्या अंधश्रद्धेचा आधार
एका मोठ्या नेत्याच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचा प्रकार उघडकीस
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून चमत्कार सिद्ध करणाऱ्यास २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
Sangali News: सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा माहोल सुरू आहे. निर्भय व निपक्षपाती निवडणुका लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात काही ठिकाणी करणी, जादूटोणा यांसारख्या अंधश्रद्धेचा आधार घेतला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या असून, अशा प्रवृत्तींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.
ते म्हणाले,” विटा येथे एका राजकीय पुढाऱ्याच्या घरासमोर करणी व अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्या व्यक्तीस रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यापूर्वी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या काळातही अनेक ठिकाणी करणी, जादूटोणा व अघोरी प्रकार झाल्याचे समोर आले होते. त्या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून जनजागृती केली होती. आष्टा, इस्लामपूर, कामेरी आदी भागात उमेदवार व नेत्यांच्या घराजवळ असे प्रकार केल्याचे प्रकार समोर आले होते. काही दिवसांपूर्वी येलूर गावातही हयात नसलेल्या एका मोठ्या नेत्याच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.अशा प्रकारांमागे असलेल्या मांत्रिक, तांत्रिक, बुवाबाबांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये स्वतःहून गुन्हे दाखल करावेत. आवश्यक ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रबोधन करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस खात्याने काही महिन्यांपूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला होता. मात्र सांगली जिल्ह्यात अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात असा कक्ष सुरू झाल्याचे ऐकिवात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राला संत व समाजसुधारकांचा मोठा वारसा लाभलेला आहे. हा वारसा न समजून घेतल्यामुळेच समाजात अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला जात असल्याचे दिसते. करणी व जादूटोणा या पूर्णपणे भ्रामक व अवैज्ञानिक बाबी असून, त्याद्वारे कुणाचे चांगले-वाईट करता येत नाही, याची खात्री देतो, असे संजय बनसोडे म्हणाले.
करणी, जादूटोणा किंवा देव घालून कुणाचे काही करता येत असल्याचा दावा करणाऱ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान असून, असे चमत्कार सिद्ध करणाऱ्यास २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर आहे. मात्र आजअखेर हे आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. जर असे प्रकार शक्य असते, तर देशाच्या सीमेवर सैनिकांच्या ऐवजी हेच तंत्र-मंत्र करणारे लोक नेमले गेले असते, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवार कोणकोणते मार्ग अवलंबतात, हे सर्वज्ञात असून, नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक युगात अंधश्रद्धांचा आधार घेणे म्हणजे विज्ञान, ज्ञान व माणुसकीचा पराभव असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३६ वर्षे प्रभावीपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असून, जनजागृतीसाठी समिती सदैव सज्ज असल्याचे संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.
Web Title: In sangli an incident of black magic and sorcery occurred in front of a prominent leaders house before the elections