सासवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; उद्योजकांची घरे टार्गेटवर
सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यात गेल्या काही महिन्यात चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्याचे प्रमुख शहर असलेल्या सासवडमध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी सासवड मधील उद्योजकांची घरेच टार्गेट केली असून वेगवेगळ्या घटनांत लाखो रुपयांचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळविण्यात आली आहे. केवळ एखाद्या रात्री घर बंद दिसले की, घरफोडी नक्की हे सूत्र दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या घटना होवून एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबत दिवसेंदिवस वाढत असून पोलीस यंत्रणा काय करीत आहे? आणि उद्योजकांच्या घरांवरील चोरीचे सत्र कधी थांबणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही दिवसापूर्वीच सासवडमधील मंडलाधिकारी सुधीर बडदे यांच्या घरातून तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित कुटुंबीयांनी संशयित व्यक्तीचे नाव सांगून गुन्हा दाखल करण्यास तब्बल एक महिना लावला. त्यानंतर दागिने अद्याप मिळालेले नाहीत, अथवा काहीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. दोन, तीन महिन्यापूर्वी सासवडमधील धुमाळ पेट्रोल पंपचे मालक धुमाळ यांचेही घर फोडले होते. या घटनेत सोने चांदीचे दागिने तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. मात्र केवळ गुन्हा दाखल होण्याव्यातिरिक्त कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.
पंधरा दिवसापूर्वीच सासवडमधील अतुल अशोक जगताप रा. जगताप आळी, पोलीस लाईन समोरील घरावर दरोडा टाकून सोने, चांदीचे दागिने आणि काही लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. यामध्ये सहा तोळे वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, तीन तोळे वजनाचे सोन्याचे साखळीतील गंठण, १. ५ तोळे वजनाचे सोन्याचे काळे मण्यातील गंठण, १. २ तोळे वजनाची सोन्याची चैन, १ तोळे वजनाचे कानातील सोन्याचे झुबे वेल, ५ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टोप्स, तसेच चांदीचे ताट, ग्लास या दागिन्यांसह काही रक्कमही चोरून नेली आहे.
रविवारी (दि. २२) पुन्हा चोरट्यांनी एका मोठ्या उद्योजकाच्या घरावर डल्ला मारून सोने चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सासवड मधील भोंगळे पेट्रोल पंपचे मालक हेमंत जयवंतराव भोंगळे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. यामध्ये सोने, चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम, पासपोर्ट असा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एकूण घटनेचा आलेख पाहता केवळ उद्योजकांच्या घरावरच दरोड्यांचे सत्र वाढले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी दरोडे टाकून कित्येक तोळे दागिने, रोख रक्कम लंपास होत असताना पोलीस तपासात एकाही घटनेचा छडा लागला नाही.
आठ अधिकारी आणि पन्नास कर्मचारी; मात्र सुरक्षा रामभरोसे
काही वर्षापूर्वी सासवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता असल्याने तपासकामे, बंदोबस्त करण्यात अडचणी येत होत्या. याबाबत वेळोवेळी आवाज उठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत सासवड पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उप निरीक्षक, २ बढती मिळालेले पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ८ अधिकारी ५० ते ५५ पोलीस कर्मचारी एवढी संख्या असताना एकही तपास पूर्ण होताना दिसत नाही.
निवडणूक काळात कारवाई मग आता का नाही ?
निवडणूक काळात पोलिसांकडून दररोज हॉटेलवरील बेकायदेशीर दारूविक्रीवर कारवाई होत होती. मात्र निवडणूक संपताच होटेलवरील कारवाई थांबविण्यात आली. त्यामुळे आर्थिक हितसंबंधातून हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती आहे. सासवडमध्ये चक्री, जुगार, बेकादेशीर दारू विक्री जोमात असताना पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
हे सुद्धा वाचा : आता शेतकरीही नाही सुरक्षित! माढ्यात अपहरण करुन खंडणीची मागणी
दरोडा असताना चोरीचे गुन्हे दाखल
चोरीच्या घटनेतील ऐवजाची किंमत आणि चोरीची घटना पाहता सर्व दरोड्याचे गुन्हे आहेत. केवळ सोने चांदीच्या दागिन्यांची किंमत लाखोंच्या घरात असून, रोख रक्कम वेगळी असताना पोलिसांनी दप्तरी केवळ चोरी अशी नोंद केली आहे. तसेच सध्या सोन्याचा दर ८० हजार रुपये तोळा असताना दप्तरी केवळ २० हजार रुपये लावल्याचे दिसत असल्याने सासवड पोलीस कोणत्या जमान्यात वावरत आहेत? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी आणि स्वतःची कातडी वाचविण्यासाठी कलमे बदलली जात आहेत का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय सासवडमध्ये असूनही पोलिसांवर त्यांचे नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.