
अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
Indian Coast Guard: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संयुक्त कारवाई करत समुद्रमार्गे सुरू असलेली अमली पदार्थांची मोठी तस्करी उधळून लावली आहे. लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात ही कारवाई करण्यात आली. संशयित इराणी ‘धो’ बोटीतून सुमारे 526 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन आणि मेथामफेटामाइन जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत 3 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 25 सप्टेंबर 2026 रोजी तटरक्षक दलाने समुद्र आणि हवाई मार्गाने संशयित बोटीवर नजर ठेवली. त्यानंतर बोटीचा पाठलाग करून तिला अडवण्यात आले आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीवर चढून तपासणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हेरॉईन आणि मेथामफेटामाइन आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
या इराणी बोटीवर असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. बोट, तिच्यावरील कर्मचारी आणि जप्त करण्यात आलेला अमली पदार्थांचा साठा सशस्त्र सुरक्षेत मुंबईत आणण्यात आला आहे. पुढील तपासासाठी विविध यंत्रणांकडून संयुक्त चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.
The Bharatiya Tatrakshak, in coordination with the Anti-Terrorism Squad (ATS), Gujarat, intercepted an Iranian dhow in the Arabian Sea, west of Lakshadweep, on September 25. Approximately 526 kg of heroin and methamphetamine, valued at over Rs 3,000 crore in international… pic.twitter.com/MbNMYeN128 — IANS (@ians_india) September 30, 2026
समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भारतीय तटरक्षक दलाने यापूर्वीही गुजरात ATSसह अनेक कारवाया केल्या आहेत. तटरक्षक दलाच्या अधिकृत नोंदीनुसार एप्रिल 2025 मध्ये गुजरात किनाऱ्याजवळ संयुक्त कारवाईत 307.50 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, ज्यांची किंमत सुमारे 1,800 कोटी रुपये होती.
चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी बोट, कर्मचारी आणि जप्त केलेला माल कडक सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत आणण्यात आला आहे. ही कारवाई गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सहकार्याने करण्यात आली. राज्य एटीएसने पाच पाकिस्तानी नागरिकांच्या अटकेचीही पुष्टी केली आहे.
ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा सुरक्षा यंत्रणा सागरी मार्गांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र करत आहेत. तटरक्षक दलाने म्हटले आहे की, ही कारवाई त्यांची पाळत ठेवण्याची क्षमता, सागरी अमली पदार्थांची तस्करी रोखण्याची क्षमता आणि भारतीय सागरी हद्दीतील बेकायदेशीर कारवाया रोखण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते.
या जप्तीमुळे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या आर्थिक जाळ्यांना खीळ घालण्यास आणि कृत्रिम अमली पदार्थांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यास मदत होईल, असे दलाने म्हटले आहे. “जप्त केलेली बोट, तिचे कर्मचारी आणि जप्त केलेले अमली पदार्थ अनेक यंत्रणांच्या संयुक्त चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी सशस्त्र सुरक्षेसह मुंबईत आणण्यात आले आहेत,” असे तटरक्षक दलाने सांगितले. समुद्रातील ही कारवाई गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सहकार्याने करण्यात आली.