सातारा : साताऱ्यातील (Satara) राजवाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबारात आप्पा मांढरे (Appa Mandhre) जखमी हे झाले आहेत. मांढरे यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी असून त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात (Satara District Hospital) दाखल करण्यात आले आहे.
राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळ्या लागल्याने मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.
हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस आणि सातारा शहर पोलिसांना (Satara Police) मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारेकर्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदीसुद्धा केली आहे.






