दारू पाहिजे का? मागच्या दाराने या...; सातारा जिल्ह्यात मुख्य चौकातच अवैध व्यवसाय
मसूर : मसूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री आता अलिकडेच सुशोभित केलेल्या एका मुख्य चौकातच रस्त्याकडेला एका दुकानातून सुरू आहे. या दुकानदाराने आगळा वेगळा फंडा वापरला आहे. त्याची शक्कल त्याच्या पथ्यावर पडत आहे. तुम्हाला दारु पाहिजे आहे का….मागच्या दाराने या…या अलिखित नियमानुसार दुकानाचे पुढचे शटर कायमस्वरूपी बंद मात्र मागील दरवाजातून खुलेआम अवैद्य दारू विक्री सुरू आहे. अनेक दिवसापासून या अवैध व्यवसायाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांत माहिती दिली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मसूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने विकसित झालेल्या चौकात अवैद्य दारू बिन्दक्तपणे सुरू आहे. परिसरात लहान मोठी गावे असून या चौकात नागरिकांसह महिलांची, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींची गर्दी असते. याच चौकात अवैद्य दारू विक्री सुरू आहे. दुकानाचे पुढील शटर बंद तर मागच्या दाराने दारू विक्री सुरू आहे. या अवैद्य दारू विक्रीबाबतची माहिती पोलिसांना असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अवैध दारू विक्री करण्यासाठी अलिखित परवाना कसा काय मिळालाॽ पोलिसांचाच वरदहस्त असल्यानेच दारू विक्री सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे. कोणीही यावे अवैध धंदे सुरू करावेत. या अवैद्य व्यवसायाला सर्टिफिकेट व बळ कसे काय मिळते, हा मोठा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
हे सुद्धा वाचा : शासकीय नोकरीच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल 5 लाखांना घातला गंडा
पेट्रोलिंगचा काय उपयोग ?
अवैध दारू विक्रीची पोलिस खात्याला माहिती नसेल तर त्यांच्या पेट्रोलिंगचा काय उपयोग, खबऱ्यांचा काय उपयोग, परिसरातील पोलिस पाटील काय करतातॽ असे प्रश्न समोर येतात. अवैध दारू विक्रेत्यावर पाेलिसांचा वचक नाही का? कोणीही यावे आणि अवैध धंदे सुरू करावेत, असा अलिखित नियम आहे कायॽ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे सुद्धा वाचा : 4 लाखांची लाच घेणं भोवलं; मंडलाधिकाऱ्याला ACB ने रंगेहात पकडले
कालगावालाही बेकायदेशीर विक्रीॽ
काही दिवसापूर्वी कालगावला गुन्हे अन्वेषण विभाग व दारू उत्पादन शुल्क विभागाने खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर अचानक धाड टाकली होती. अवैध दारू विक्री संदर्भात या विभागाला माहिती मिळते. कारवाई देखील होते. मात्र मसूर पोलिसांना अवैध दारू विक्री संदर्भात काहीही माहिती नसते. त्यांच्याकडून कारवाई होत नाही. आत्ताही कालगावला बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.